रुक जाना नही ...
कही बिल्डिंग.. कही ट्रामे.. कही मोटर... कही मिल...
किती अर्थपूर्ण बोल आहेत गाण्याचे ! क्षणाक्षणाला धावणार्या मुंबापुरीचे हे यथार्थ दर्शन . महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई गेले तिन चार दिवस ठप्प झाली आहे. जगाला हादरवून सोडलेल्या कोरोनाचा हा परिणाम. एरव्ही शासनाचे आदेश धुडकाऊन लावत प्रत्येक क्षण हा निसटता कामा नये या मानसिकतेने अखंड काम करणार्या शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक खुप वरचा आहे.
आजवर या मुंबापुरीने अनेक संकटांशी यशस्वीपणे मुकाबल केला आहे . अगदी अलिकडचेच उदाहरणच द्यायचे झाले तर १३ जुलै, इ.स. २०११ ला झालेले बॉंबस्फोट. लागोपाठ तीन ठिकाणी बाँबस्फोट झाले. दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस अशा तीनठिकाणी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी आयईडीच्या मदतीने घडवण्यात आलेल्या या स्फोटांमध्ये अधिकृत आकड्यानुसार २१९ लोक मृत्युमुखी पडले . त्याच्या आधी ११ जुलै २००६ ला झालेले ७ साखाळीबॉंबस्फोट असोत किंवा २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी अतिशय योजनाबद्ध पद्धतीने घडवून आणलेला अतिरेकी हल्ला अश्या असंख्य घटनांची साक्षिदार मुंबई .
विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा मुंबापुरीवर अशी संकटे आली तेव्हा तेव्हा मुंबईने खंबिरपणे आणि अत्यंत समर्थतेने सर्व संकटांचा सामना केला आणि त्यातून सहिसलामत सुटका करून घेतली. हे सर्व करत असताना घड्याळाच्या काट्यावर सेकंदा-सेकंदाला अखंडपणे धावणारी ही नगरी आजवरच्या ईतिहासामध्ये ठप्प झालेली कोणीही बघितलेली नाही. आपल्या देशाचीच नव्हे तर आशिया खंडामधली एक महत्त्वाची आर्थिक राजधानी आज मात्र गेल्या संपूर्ण शतकभराचा विक्रम मॊडून थंड पडली आहे. " कोविड १९ " अर्थात कोरोना विषाणूचा हा प्रताप आहे. संपूर्ण जगाला ज्या वेगाने हा विषाणू ग्रासून टाकत आहे ते बघून धडकी भरावी अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे.
आजवर ज्या धैर्याने आणि संयमाने आपण सर्व मुंबईकर आलेल्या संकटांशी सामना केलेला आहे त्याच धैर्याने आणि संयमाने आत्ताचे हे महाभयंकर संकट आपल्याला परतवून लावायचे आहे. गरज आहे फक्त एकजुटीची , संयमाची , स्वयंशिस्तीची , वैयक्तीक स्वच्छतेची आणि धैर्याची . आलेल्या प्रत्येक संकटांचा आपण धीरोदात्तपणे सामना केलेला आहे आणि या पुढेही करत राहूयात आणि अभिमानाने म्हणू या ..
इ है बॉंम्बे . इ है बॉंम्बे ... इ है बॉंम्बे मेरी जान !!